Oct 05
आदि पराशक्ती : एक असीम शक्ती (Adi Parashakti : The Eternal Power)
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्व कार्यांची मंगलमयी आणि शुभ सुरुवात व्हावी, तसेच सर्व कार्ये निर्विघ्नपणे सिद्धीस जावी, ह्यासाठी सर्वप्रथम "श्री गजाननास " वंदन करू.
एक वैश्विक, अद्वितीय, असीम शक्ती… एक तेजस्वी चेतना, एक जागृत शक्ती, जिच्या ऊर्जेने समस्थ सृष्टीची निर्मिती होते. हीच शक्ती ह्या सृष्टीचे माता रूपाने पालन करते आणि हिच्याच रौद्र अंशाने सृष्टीचा लय होतो. हि ऊर्जा निर्माण कशी झाली ? तिचा आकार कसा आहे? तिचा उगम कुठला ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात स्वाभाविक येतात, परंतु हि शक्ती, हि चेतना निराकार आहे, तिला कोणताही विकार नाही. अनासक्त अशी हि शक्ती सर्वत्र सदैव संचार करते आणि सर्व चेतना सचेत ठेवते. ही शक्ती म्हणजेच आपल्या निर्मितीतत्वातील परमशक्तीस्त्रोत, देवी आदिशक्ती, जगदंबा "माता आदि पराशक्ती "... जिच्या कृपेमुळे समस्थ त्रिदेव, देव, मुनी, ऋषी, गंधर्व, किन्नर, असुर, मानव, पशु-पक्षी ह्या जीवनासारखे सुंदर स्वप्न अनुभवतायेत.
हिंदू पुराण शास्त्रांनुसार सृष्टीर्निर्मितीचे तर्क अनेक अंगाने अभ्यासले जातात. काही पुराणांमध्ये भगवान विष्णूंना मूळपुरुष मानून सृष्टीनिर्माते मानले जाते, ज्यांना आपण आदि नारायण म्हणून संबोधतो. ब्रम्हपुराणामध्ये भगवान ब्रम्ह्देवांना सृष्टीनिर्माते मानून त्यांनी ब्रम्हांड निर्माण केले आहे. काही पुराणांननुसार शिव आणि शक्ती म्हणजेच पुरुष आणि प्रकृती ह्यांच्याद्वारे सृष्टीनिर्माण कार्य झाल्याचे स्पष्ट होते. तर काही पुराणांनुसार " ॐ " ह्या मूळ ध्वनीलहरीतून सृष्टीनिर्माण झाले आहे असे नमूद आहे. परंतु ह्या सर्व तर्कांचा नीट विचार केल्यावर आपल्याला समजेल, कि ह्या सर्व भिन्नभिन्न मतांमध्ये एकमत आहे. एक सूक्ष्म, परंतु सूचक असा एक समान घटक आपल्याला सृष्टीनिर्माण संभ्रमातून निश्चितच बाहेर काढतो, तो म्हणजे " निर्माणशक्ती ". सृष्टीनिर्माण कार्य निश्चितच एका महान माध्यमाद्वारे संपन्न झाले परंतु त्या कार्यामागे जी महान शक्ती कार्यरत होती, तिला आपल्याला विसरता येणार नाही. तीच हि परमशक्तीस्त्रोत आदि पराशक्ती. हि शक्ती स्त्रीतात्वाचे सूचक आहे, ह्याच कारणाने आपण स्त्रीशक्तीची आराधना करतो, तिच्या वैविध्यपूर्ण रूपांचे पूजन करतो. ह्या आदिमाया जगदंबेमध्ये अचाट शक्तीचा वास आहे. ती कधी मातारूप जननी आहे, कधी पत्नीरूप सहचारिणी आहे, कधी रौद्ररूप सौहारक विनाशिनी आहे तर कधी मायारूपिणी आहे. हीच वैश्विक शक्ती सर्वत्र, अगदी आपल्या मध्येही संचरित आहे. जिच्या स्वरुपाचे प्रत्यक्ष वर्णन करण्यास शब्दांचे अनेक अलंकार अपुरे पडतात, अश्या त्या जगत् जननी माता आदि पराशक्तीला शतशः नमन..!!
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!