Oct 05

नवरात्री आणि नवदुर्गा (Navratri and Navadurga)

नवरात्री..! हिंदू संस्कृती मधला सण, घरोघरी आदिशक्ती, आदि-मातेच्या पुजनानी संपन्न होणारा हा सण. नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या सणात आदिमाता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहावा दिवस हा विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा होतो

 

दुर्गा  (Maa Durga)

 

माता आदि पराशक्तीने ह्या सृष्टीनर्माण कार्यासाठी स्वतःला तीन तत्वात विभाजित केले. आदि पराशक्तीच्या सात्विक गुणातून निर्माण झाली, ती माता "महासरस्वती" जी आदिमायेचे सात्विक स्वरूप बनून भगवान ब्रम्ह्देवांची शक्तीस्वरूपिणी बनली. ह्याच आदिमायेच्या राजस गुणातून महादेवी "महालक्ष्मी" अवतरीत झाली, जी विष्णुप्रिया भगवान विष्णुंची शक्तीस्वरूप झाली. आणि ह्याच आदि पराशक्तीच्या तामस गुणातून निर्माण झाली भगवान शिवाची शक्ती म्हणजेच "पार्वती" जिला आपण दुर्गा रूपात पूजतो. "दुर्गा" हे माता पार्वतीचे योद्धास्वरूप आहे. दुर्गेचा निर्माण हाच असुरांच्या संहाराचा मूळ उद्देश. माता दुर्गा हे प्राकृत शक्तीचे प्रतिक असून तिने अनेक असुरांचा सर्वनाश करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यार्थ, स्वतःला नऊ शक्तींरूपात मध्ये विभाजित केले. नवग्रहांवर स्वतःचे आधिपत्य स्थापित केले. नवदुर्गेच्या विविध रूपांद्वारा ब्रम्हांडातील सर्व ग्रहांना ऊर्जा प्राप्त होते. ह्या सर्व ग्रहांचे कार्य सुचारुपणे चालावे ह्यासाठी नवदुर्गा ह्या ग्रहांचे आधिपत्य करतात. नवरात्री मध्ये देवीच्या नऊ रूपांचे दर्शन भक्ताला होते, तिलाच नवदुर्गा असाही म्हणतात. नवदुर्गा म्हणजे नवस्वभावांचे दर्शन.

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!

Date: 05 Oct 2013